Image Source:(Internet)
रशिया:
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) अलीकडेच भारताला भेट देऊन परतले आहेत. त्यांच्या या दौऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व देण्यात आले होते, कारण हा भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा होता.
या भेटीदरम्यान अनेक महत्वाच्या करारांवर सह्या झाल्या असून, रशियाने भारताला कच्च्या तेलाचा नियमित पुरवठा करीत राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
भारतावर अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर भारत आणि रशियामधील व्यापार वाढल्याचे आर्थिक आकडे दर्शवित आहेत. या संदर्भात रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव यांनी म्हटले आहे की, रशियाने कधीही कोणत्याही देशाच्या दबावाखाली भारतासोबत संबंध प्रस्थापित केलेले नाहीत. भारत हा रशियाचा एक विश्वासू आणि महत्वाचा भागीदार आहे.
पुतिन यांनीही भारत दौऱ्यादरम्यान सांगितले की, ही मैत्री कोणत्याही तिसऱ्या देशाविरुद्ध नसून, केवळ आपले आर्थिक आणि राजकीय हित जपण्यासाठी आहे.
रशियाच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला निश्चितच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण भारताचा रशिया आणि चीनबरोबर वाढता व्यापार अमेरिकेच्या धोरणांसाठी आव्हान ठरू शकतो. त्यामुळे पुढील काळात अमेरिकेने आपली रणनीती पुनरावलोकन करावी लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे.