साताऱ्यात एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; राजकीय संबंधांच्या आरोपांमुळे खळबळ

    15-Dec-2025
Total Views |
 
MD drugs factory exposed in Satara
 Image Source:(Internet)
सातारा :
जिल्ह्यात अंमली पदार्थ निर्मितीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जावळी तालुक्यातील सावली गावात छापा टाकून थेट म्हशीच्या गोठ्यात सुरू असलेला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, स्थानिक पोलिसांना या कारखान्याची कोणतीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
 
शनिवारी पहाटे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी 7 किलो 718 ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच 38 किलो द्रवरूप रसायनांचा साठा जप्त केला. बाजारभावानुसार जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 15 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी तीन बांगलादेशी कारागीरांसह चौघांना अटक करण्यात आली असून, चौकशीनंतर सर्व आरोपींना मुंबईला हलवण्यात आलं आहे.
 
या कारवाईनंतर प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरून सरकारवर गंभीर आरोप करत या ड्रग्ज कारखान्याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित करत विचारलं आहे की, पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इतक्या दुर्गम भागात कोणाच्या मदतीने वास्तव्यास होते? ड्रग्ज निर्मिती सुरू असलेल्या गोठ्याची जागा वापरण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीने परवानगी देण्यात आली? ओंकार दिघे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन नंतर कोणाच्या दबावामुळे सोडण्यात आलं? तसेच या रॅकेटशी संबंधित इतर कामगारांना पळून जाण्यास मदत कोणी केली, याचाही तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणात अलीकडेच 2 किलो एमडी ड्रग्जसह अटक करण्यात आलेला विशाल मोरे आणि या संपूर्ण नेटवर्कमधील इतर व्यक्तींमधील संबंधांबाबतही विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. कारवाईपूर्वी काही संशयित व्यक्ती एका हॉटेलमध्ये उपस्थित होत्या, त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
 
या प्रकरणावरून सरकारवर टीका तीव्र होत असून, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी गृहखात्यावर गंभीर आरोप केले आहेत. एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त असल्याने तरुणांमध्ये त्याचा वाढता प्रसार चिंताजनक असल्याचंही ते म्हणाले.
ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना जर राजकीय पाठबळ मिळत असेल, तर ही बाब राज्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जातो आणि आरोपांमागचं सत्य काय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.