Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठी भूमिका स्पष्ट करत, पुण्यात महायुती होणार नाही, असे जाहीर केले. आगामी निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयावर अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, पुण्यातील स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेता स्वबळावर लढण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांच्या भूमिकेत आहे. दोन्ही पक्षांची शहरात भक्कम संघटनात्मक ताकद असल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे पुण्यात महायुती नसल्याचे चित्र आता अधिकृत झाले आहे.
दरम्यान, राज्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांमध्ये परिस्थितीनुसार महायुती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजप-शिवसेना तर काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती दिसून येईल. या निवडणुका मैत्रिपूर्ण वातावरणात पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारच्या विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्याचे सांगत, शहरांतील मतदार विकासालाच प्राधान्य देतील आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.