कन्हान नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ!

    15-Dec-2025
Total Views |
 
Dead body found
 Image Source:(Internet)
नागपूर :
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील भानखेडा गावाजवळ कन्हान नदीच्या (Kanhan River) पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे.
 
सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या निदर्शनास नदीत तरंगणारा मृतदेह पडताच त्यांनी तात्काळ खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
 
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत महिलेचे वय ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भानखेडा परिसरातील कन्वेयर बेल्ट लाईनच्या खाली कन्हान नदीत हा मृतदेह आढळून आला.
 
मात्र, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. खापरखेडा पोलीस परिसरातील तसेच आसपासच्या भागांतील गेल्या काही दिवसांत बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती तपासत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.