Image Source:(Internet)
पुणे :
मावळ (Maval) तालुक्यात ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (१४ डिसेंबर) ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी रविवारी सायंकाळी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाली. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही ती आढळून न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पीडितेच्या घराजवळ राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला फुसलवून नेल्याचे उघड झाले. चौकशीत त्याने हत्या केल्याचीही कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यानुसार घटनास्थळ गाठले, तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला.
सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर पुढील कलमे वाढवली जाणार आहेत.
दरम्यान, या अमानुष घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसेल, अशीही त्यांनी मागणी केली आहे.