Image Source;(Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) ग्रामीण पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हान-रामटेक महामार्गावर मोठ्या कारवाईत मेफेड्रोन (एमडी) विक्री करणाऱ्या संशयितांना पकडले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गंभीर तस्करीचा शोध लागला आहे.
१२ डिसेंबर २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या आदेशावर पोलिस निरीक्षक अमोल नागरे यांच्यासह पथकाने पेट्रोलिंग करताना कन्हान नदी पुलाजवळ एक संशयास्पद मारुती सुझुकी सेलेरिओ कार आढळून आली. पोलीस दिसताच कारने वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग करून बोसर्डा टोलनाक्याजवळ कार थांबवली.
कारमध्ये ४२ वर्षीय विजय नंदलाल रहांगडाले (रा. वाठोडा, नागपूर) आणि एक महिला असल्याचे समोर आले. चौकशी दरम्यान त्यांची उत्तरं धूसर असल्याने तपास सुरू केला असता रहांगडाले यांच्यावर आधीही एमडी विक्रीप्रकरणी गुन्हा नोंदवलेला असल्याचा खुलासा झाला.
कन्हान पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पंचनामा, झडती आणि जप्तीची कारवाई पूर्ण करण्यात आली. घटनास्थळी महिला पोलीस, पंच, फोटोग्राफर आणि मापारीही उपस्थित होते.
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे एमडी विक्रीचे जाळे ध्वस्त झाले असून, पुढील तपास सुरू आहे.