Image Source;(Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bhaeen Yojana) सहभागी झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. योजनेतील e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थींना एकदाची अंतिम संधी देण्यात येणार असून ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिलांनी e-KYC करताना चुकीची नोंद केली असल्याचे निदर्शनास आल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. ही योजना महिलांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राबवली जात असल्याने, केवळ तांत्रिक त्रुटींमुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून दूर राहू नये, हा शासनाचा उद्देश आहे.
ज्या महिलांचे पती अथवा वडील दिवंगत झाले आहेत, अशा लाभार्थी महिलांसाठीही e-KYC प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. संबंधित महिलांनी ऑनलाइन पोर्टलवर स्वतःचे e-KYC पूर्ण करून मृत्यू प्रमाणपत्राची प्रत स्थानिक अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी, अशा स्पष्ट सूचना महिला व बालविकास विभागाने दिल्या आहेत.
दरम्यान, योजनेतील लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अधिकाधिक महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि पारदर्शक करण्यावर शासनाचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.