दिव्यांग, वृद्धांसाठी गृहमतदान नाही; मनपा निवडणुकांबाबत आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

    13-Dec-2025
Total Views |
 
No Home voting
 Image Source;(Internet)
मुंबई :
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी देण्यात येणारी गृहमतदानाची (Home voting) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
 
निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांबाबतचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा देण्यात आली होती. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असल्याने प्रत्येक मतदारासाठी दोन ते तीन ईव्हीएम मशीन घेऊन जाणे आणि मतदान करून घेणे तांत्रिकदृष्ट्या अवघड ठरणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
 
तथापि, दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना मतदान सुलभ व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचेही आयोगाने सांगितले. अशा मतदारांना घेऊन येणारी वाहने थेट मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्याची मुभा देण्यात येईल. तसेच, शक्य असल्यास संबंधित मतदारांचे मतदान केंद्र तळमजल्यावरच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
दरम्यान, मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येऊ नयेत, अशी एकमुखी मागणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. अशा संकुलांमध्ये बहुसंख्य पक्षाचे कार्यकर्ते मतदारांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. काही ठिकाणी विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यास सोयी-सुविधा बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचेही प्रतिनिधींनी सांगितले.
 
मुंबई आणि पुणे वगळता इतर महापालिकांमध्ये मोठ्या गृहनिर्माण संकुलांची संख्या तुलनेने कमी असल्याने, अशा ठिकाणी मतदान केंद्रांची आवश्यकता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
मुंबईसाठी स्वतंत्र निर्णय
मुंबई महापालिकेतील परिस्थिती वेगळी असल्याने, दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठीच्या सुविधा तसेच मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील मतदान केंद्रांबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
 
मुंबईत एकसदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रत्येक मतदान केंद्रामागे १,००० ते १,२०० मतदारांची मर्यादा असल्याने, संकुलांमध्येच मतदान केंद्र उभारणे अधिक सोयीचे ठरू शकते. या विषयावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.