सत्ताधाऱ्यांच्या घरात बिबट्या शिरला तरच सरकारला जाग येईल; बच्चू कडूंचा संताप

    11-Dec-2025
Total Views |
 
Bachchu Kadu
 Image Source:(Internet)
अमरावती :
राज्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तातडीने नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
 
कडू म्हणाले, “राज्याकडे हजारो बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद नाही. हे सरकार म्हणजे ‘जाई तिथं खाई’ अशी परिस्थिती आहे.” ते पुढे म्हणाले, “एखाद्या आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या अंगणात बिबट्या घुसला तरच शासनाला खऱ्या अर्थाने परिस्थितीचे गांभीर्य कळेल. साध्या नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आला की सरकारला काहीच जाणवत नाही.”
 
शेतकऱ्यांवरील संक्रांत; सरकारवर तिखट टीका-
यावेळी कडूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरही सरकारला चांगलेच सुनावले. अतिवृष्टी, पिकांची नासाडी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
“मरणारा शेतकरी कुठल्या धर्माचा नसतो का? त्याच्याकडे पाहायला सरकारकडे वेळच नाही,” असे सांगत त्यांनी तातडीच्या कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफीची प्रक्रिया ढिम्म राहिल्यास महाराष्ट्रभर रेल्वे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
रवी राणा आणि प्रवीण परदेशींवर टोकाची टीका-
कडूंनी अमरावतीचे खासदार रवी राणा आणि प्रवीण परदेशी यांच्यावरही उपरोधिक बाण सोडले. “परदेशी देशात आहेत की परदेशात, हे आधी तपासा,” असा खोचक टोमणा त्यांनी मारला. रवी राणा यांच्या विधानांवर बोलताना ते म्हणाले, “किल्ले काबीज करण्यात व्यस्त असणारे अनेक आहेत… पण इथे शेतकरी रोज जीव देतोय.”
 
ईव्हीएमवर पुन्हा वादाचा धुरळा-
मतदान प्रक्रियेबाबतही कडूंनी गंभीर आरोप केले. “15 ते 20 टक्के ईव्हीएममध्ये मोठा गोंधळ आहे,” असा दावा करत त्यांनी बॅलेट पेपर प्रणालीची मागणी केली. “खरे रामभक्त असाल तर बॅलेटवर यायला पाहिजे,” असा सणसणीत टोलाही त्यांनी सत्ताधारी पक्षांना दिला.
 
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर प्रहार-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कडूंनी स्पष्टपणे म्हटले, “एकत्र येऊन शेतकऱ्यांचे कोणते भले करणार ते? येथे सर्वांचा उद्देश सत्ता मिळवणे हा आहे; शेतकऱ्यांचा नाही.” शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावरही त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
राज्यातील वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून ते राजकीय घडामोडींपर्यंत कडूंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे.