सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याने गाठला नवा रेकॉर्ड!

    11-Dec-2025
Total Views |
- चांदीची किंमतही १.९९ लाखांवर पोहोचली

Gold and silver marketImage Source:(Internet) 
नागपूर :
११ डिसेंबर रोजी सकाळी सोनं (Gold) आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. दिल्ली, मुंबई, चेन्नईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरांनी नवे उच्चांक झेवल्या आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित आणि स्थिर मालमत्तेकडे कल वाढलेला आहे. यंदा सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळाला आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३०,४७० रुपये झाली, तर चांदी प्रति किलो १,९९,१०० रुपयांवर पोहोचली आहे.
 
या वर्षी आतापर्यंत देशांतर्गत सोन्याच्या किमतीत जवळपास ६७% वाढ झाली आहे. आर्थिक अनिश्चिततेमुळे आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोनं गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. ११ डिसेंबरला देशभरात आणि जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढत्या ट्रेंडवर आहेत.
 
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५% कपात केल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यावरील आकर्षण वाढलं आहे, कारण कमी व्याजदरांमुळे बाँड्सवरील उत्पन्न कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट दर प्रति औंस ४,२०१.७० डॉलर पर्यंत गेला आहे, ज्याचा देशांतर्गत किमतींवर प्रभाव दिसतो आहे.
 
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १३०,४७० रुपये तर २२ कॅरेट सोनं ११९,६१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर १३०,३२० रुपये आणि २२ कॅरेटचे दर ११९,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहेत.
 
पुणे आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १३०,३२० रुपये असून २२ कॅरेटची किंमत ११९,२९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. अहमदाबाद, जयपूर, भोपाळ आणि लखनऊ सारख्या प्रमुख शहरांमध्येही हे दर जवळपास समान आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थिती स्थिर राहिल्यास किंवा रुपयाच्या किंमतीत घट झाल्यास २०२६ पर्यंत सोन्याच्या किमतीत ५% ते १६% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
चांदीच्या बाजारातही जोरदार तेजी दिसून येत आहे. ११ डिसेंबरला चांदीची किंमत प्रति किलो १,९९,१०० रुपये झाली आहे. यंदा आतापर्यंत चांदीच्या किमतीत ११४% इतकी झपाट्याने वाढ झाली आहे. जागतिक बाजारात चांदीचा दर प्रति औंस ६१.६० डॉलरवर पोहोचला असून, याचा देशांतर्गत किमतींवरही सकारात्मक परिणाम दिसतो आहे.