Image Source:(Internet)
मुंबई :
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यातून सावरत असलेल्या महाराष्ट्रावर (Maharashtra) पुन्हा एकदा संकटाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने खाली जाण्याची शक्यता वर्तवून यलो अलर्ट जारी केला आहे.
मान्सूननंतर राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. अनेक शेतकऱ्यांचे पीक, जनावरे आणि घरदार पुन्हा एकदा उघड्यावर आले. आता पावसाचा धोका कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांत राज्यभर थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तरेकडून थंड वारे धडकत असल्याने तापमान सरासरीपेक्षा खाली जाणार असल्याचे आयएमडीच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले.
जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, नागपूर, गोंदिया, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत रात्री आणि पहाटे तीव्र गारठा जाणवेल, असे विभागाने इशारा दिला आहे.
हवामान विभागाने श्वसनाच्या तक्रारी असलेल्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. थंडीचा कडाका फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर भारतातही अधिक जाणवणार असल्याने पुढील काही दिवस तापमानाचा उतरता आलेख कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात पुन्हा एकदा थंड हवामानाच्या रूपाने संकटाची चाहूल लागली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.