Image Source:(Internet)
नागपूर :
दीर्घकाळ रखडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (Dr Ambedkar Convention Center) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात गतिमान होणार आहे. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सेंटरमधील सर्व उर्वरित कामे तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची सक्त सूचना देण्यात आली.
उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी बेझनबाग कार्यालयात झालेल्या चर्चेत केंद्रातील अपूर्ण कामांचा सविस्तर आढावा सादर केला. या चर्चेनंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एनआयटी आणि एनएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
मंत्री शिरसाठ यांनी अधिकाऱ्यांना बजावले की, “या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. कामांच्या दर्जावर कोणतीही तडजोड न करता नियोजित मुदतीत संपूर्ण कामे पूर्ण करा.”
राऊत यांच्या प्रयत्नांना गती-
डॉ. नितीन राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या भव्य केंद्राच्या उभारणीला दिशा मिळाली आहे. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तर नागपूरसाठी नवे विकासदालन-
या निर्णयामुळे बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर तत्त्वज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचे केंद्र आकार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास उत्तर नागपूरच्या विकासयोजनेत महत्त्वाची भर पडेल तसेच नागरिकांना सरकारी योजना व सेवांचा अधिक सुकर लाभ मिळण्यास मदत होणार आहे.