Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील गाव कामगार पोलीस (Police) पाटीलांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच तापला असून, तातडीने निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन आमदार, मंत्री आणि शासनप्रमुखांकडे देण्यात आले असून, उद्या नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी सांगितले की, 2019 नंतर मानधनात वाढ झालेली नाही. वाढती महागाई, वाढत्या जबाबदाऱ्या आणि गावस्तरावरची कायदा-सुव्यवस्था सांभाळताना येणारा वाढता ताण लक्षात घेता, मानधन 15,000 मासिक करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच, निवृत्तीनंतर पेन्शन किंवा अन्य आर्थिक सुरक्षा देऊन पोलीस पाटीलांना सन्मानाने जगता यावे, यावर संघटनेचा भर आहे.
संघटनेच्या महत्त्वाच्या मागण्या
निवृत्ती वयाची मर्यादा ६० वर्षांपर्यंत वाढवणे
मानधनात तातडीने वाढ
कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत
घरकुल व सरकारी भरतीत प्राधान्य
अधिकारात वाढ आणि कार्यमर्यादेत स्पष्टता
तालुका व जिल्हा स्तरावर स्वतंत्र पोलीस पाटील भवनांची उभारणी
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राजघर कोलते पाटील, संस्थापक सचिव कमलाकर मांगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, 3 डिसेंबर 2024 रोजी नागपुरात झालेल्या बैठकीत सर्व मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने राज्यभरातील पोलीस पाटीलांमध्ये संताप वाढला आहे.