Image Source:(Internet)
पुणे:
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या व्यवहारावरून राजकीय वातावरण तापलं असून, विरोधकांसह सत्ताधारी आघाडीतही हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेससह विविध पक्षांकडून या प्रकरणावरून पार्थ आणि अजित पवार दोघांनाही लक्ष्य करण्यात येत असताना, आता या प्रकरणात स्वतः राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला गंभीर म्हटलं आहे. जर मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की व्यवहार गंभीर आहे, तर त्यांनी चौकशी करून सत्य परिस्थिती लोकांसमोर आणावी. आम्हालाही अपेक्षा आहे की सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करावी,” असं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, एका पत्रकाराने “कुटुंबातील सदस्यावरच आरोप होत असताना तुमचं मत काय?” असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, “कुटुंब, राजकारण आणि प्रशासन या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. आमचं कुटुंब एकत्र आहे, पण राजकारणात आम्ही अनेकदा एकमेकांविरोधात लढलो आहोत. माझ्या एका नातवाने अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली होती, तर अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात उभी राहिली होती,” असं पवारांनी सांगून स्पष्ट सीमारेषा आखल्या.
या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची बाजू घेतल्याचंही दिसून आलं. “मी स्वतः पार्थशी बोलले. त्याने सांगितलं की त्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही आणि आपल्या वकिलांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबाबत वकीलच स्पष्टीकरण देतील,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तथापि, त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारले. “सरकारी जमीन विकली जाऊ शकते का? जर विक्री शक्य असेल, तर ती नियमानुसार झाली का? तहसीलदार म्हणतात त्यांनी सही केली नाही, मग कागदपत्रांवर सहीशिवाय व्यवहार झाला कसा?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस चौकशीसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.