Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी-बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ५० मेधावी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम दरवर्षी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
ही योजना मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील मनपाच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचा उद्देश म्हणजे मनपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आर्थिक भार कमी करणे, असा आहे.
सध्या नागपूर मनपाच्या माध्यमातून एकूण २८ शाळांमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. यामध्ये मराठी माध्यमाच्या ७, हिंदीच्या ११, उर्दूच्या ९ आणि इंग्रजी माध्यमाच्या १ शाळा आहेत. त्यापैकी ११ शाळा अर्ध-इंग्रजी माध्यमाच्या आहेत.
ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मनपाच्या शाळांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वाटचालीत मोठा हातभार मिळेल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.