Image Source:(Internet)
मुंबई :
तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, सोन्याच्या (Gold) दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असून, लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४३९ रुपयांनी घसरून १,२०,२३१ प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,२३,८३७) इतकी झाली आहे. तर चांदीचा दरही २३२ रुपयांनी घसरून १,४८,०१० प्रति किलो (जीएसटीसह १,५२,४५०) झाला आहे.
गेल्या महिन्यात सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. १७ ऑक्टोबरपासून सोनं तब्बल १०,६४३ ने स्वस्त, तर १४ ऑक्टोबरपासून चांदी ३०,०९० ने घसरली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी सामान्य खरेदीदार मात्र उत्साही झाले आहेत.
गुंतवणूकदार चिंतेत, ग्राहक खुश
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी घटणे, डॉलरचा दर वाढणे आणि व्याजदरातील बदल हे घटक या घसरणीमागे कारणीभूत आहेत. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणुकीपेक्षा खरेदीसाठी अनुकूल काळ असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून, सोन्याच्या घसरलेल्या दरामुळे बाजारात चैतन्य परत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कॅरेटनुसार आजचे सोने दर (७ नोव्हेंबर २०२५)
२४ कॅरेट सोने: १,२०,२३१ (जीएसटीसह १,२३,८३७)
२३ कॅरेट सोने: १,१९,७५० (जीएसटीसह १,२३,३४२)
२२ कॅरेट सोने: १,१०,१३२ (जीएसटीसह १,१३,४३५)
१८ कॅरेट सोने: ९०,१७३ (जीएसटीसह ९२,८७८)
१४ कॅरेट सोने: ७०,३३५ (जीएसटीसह ७२,४४५)
दरम्यान सोन्याचे भाव घटल्याने लग्नसराईतील खरेदीदारांसाठी हा काळ ‘सोन्यासारखा’ ठरत आहे.