पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण : अजित पवारांनी राजीनामा द्यावा;एकनाथ खडसेंची मागणी

    07-Nov-2025
Total Views |
 
Eknath Khadse demands Ajit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर कंपनीशी संबंधित संशयास्पद जमीन व्यवहाराचे आरोप होत असतानाच, या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी या व्यवहाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे.
 
खडसे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले, “या प्रकरणाची चौकशी सरकारकडून न होता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हायला हवी. अन्यथा अजित पवारांविरुद्धच्या मागील चौकशीप्रमाणेच हीही चौकशी निष्फळ ठरेल.”
 
ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. जर त्यांचा या व्यवहारात सहभाग नसेल, तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा पदावर येऊ शकतात. पण सध्या तरी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
 
खडसे यांनी या कराराला “संशयास्पद” ठरवत म्हटलं की, “जमिनीच्या या व्यवहारामध्ये अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. त्यामुळे पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे.”
 
या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून, विरोधकांकडून अजित पवारांवर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव वाढू लागला आहे.