Image Source:(Internet)
मुंबई :
‘वंदे मातरम’ (Vande Mataram) च्या १५०व्या वर्षानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन छेडले.
भाजप आमदार राज के. पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आझमी यांच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला. पुरोहित म्हणाले, “वंदे मातरम म्हणजे आपल्या भूमीचा सन्मान. ज्यांना भारतमातेविषयी आदर नाही, त्यांनी या देशात राहण्याचा अधिकार नाही. राष्ट्रगीत न गाणे म्हणजे देशाच्या संस्कृतीचा अपमान.”
महाराष्ट्र सरकारतर्फे वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या पूर्ततेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आझमी यांना राष्ट्रगीत गाण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी ते नाकारत म्हटलं, “मुस्लिम धर्मानुसार या गीतातील काही ओळी उपासना आणि प्रार्थनांशी संबंधित आहेत, त्यामुळे आम्ही ते गाऊ शकत नाही.”
यानंतर आझमी यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “जसं तुम्ही माझ्यासोबत नमाज अदा करू शकत नाही, तसंच मी वंदे मातरम गाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आहे की कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रगीत गाण्यास भाग पाडता येणार नाही.” त्यांनी भाजपवर आरोप केला की, “हा पक्ष राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रवादाचा वापर करतो.”
या प्रकरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, समाजवादी पक्षाने आझमी यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर भाजपने त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला आहे.