‘सुपर-50’ योजना; महाराष्ट्र सरकारकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत JEE आणि NEET तयारीची सुवर्णसंधी!

    06-Nov-2025
Total Views |
 
Super 50 scheme
Image Source:(Internet) 
मुंबई : 
शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुपर 50 (Super 50) नावाची अभिनव योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत अभियांत्रिकी (JEE) आणि वैद्यकीय (NEET) प्रवेश परीक्षांची मोफत तयारी सरकारकडून करून दिली जाणार आहे.
 
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून 50 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे नामांकित कोचिंग संस्थांकडून विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये संधी मिळणार आहे.
 
ही योजना मुख्यत्वे दहावी उत्तीर्ण आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. निवड प्रक्रियेसाठी शासन स्वतः स्वतंत्र परीक्षा घेणार असून, या परीक्षेच्या गुणांवरून प्रत्येक जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी ठरवले जातील.
 
विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ही योजना खर्‍या अर्थाने गरजू पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
 
माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे चे संचालक महेश पालकर यांनी सांगितले की, “या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET दोन्ही परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळेल आणि त्याचा सर्व खर्च शासन उचलणार आहे.”
 
याशिवाय, यावर्षी अकरावी सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. म्हणजेच, दहावी आणि अकरावीतील प्रत्येकी 50 विद्यार्थी एकूण 100 विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोफत कोचिंगचा लाभ मिळणार आहे.
 
‘सुपर-50’ योजनेचा प्रस्ताव सध्या शासनपातळीवर मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, लवकरच ती राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे. शिक्षणातील समान संधी निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.