Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार आणि ज्वलंत नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या मुंबईतील भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र आज त्यांनी रुग्णालयातून शेअर केलेल्या एका फोटोने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली आहे.
त्या छायाचित्रात राऊत हे हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले, हातावर सलाईन लावलेले आणि समोर कागद व पेन ठेवलेले दिसत आहेत. त्या कागदावर ‘Edit’ असा शब्द स्पष्ट दिसतोय. त्यामुळे ते ‘सामना’चा अग्रलेख लिहित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फोटोसोबत त्यांनी लिहिलंय,हात लिहित राहिला पाहिजे…कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र!”
त्यांच्या या पोस्टला जनतेकडून आणि समर्थकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. “लवकर बरे व्हा, महाराष्ट्राला तुमची लेखणी हवी आहे,” अशा शुभेच्छांनी सोशल मीडिया भरून गेला आहे.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही दिवस विश्रांती घेणार असून, तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा ‘मैत्री’ निवासस्थानी परतणार आहेत.
याआधी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्रात लिहिलं होतं,अचानक प्रकृती बिघडली आहे, पण उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्दीत जाणं टाळतोय. लवकरच नव्या जोमाने तुमच्या भेटीला येईन.”
त्यांचा फोटो पाहून समर्थक भारावून गेले आहेत. रुग्णालयात असूनही लेखणी थांबली नाही, हेच त्यांच्या जिद्दीचं आणि पत्रकारितेवरील प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातंय.