Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी २०१७ मध्ये विश्वचषक गमावल्यानंतर झालेल्या मोदींसोबतच्या भेटीची आठवण करून दिली आणि यंदा विजयी ट्रॉफीसह भेटण्याचा आनंद व्यक्त केला. उपकर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, “पंतप्रधान मोदी नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या शब्दांनी आमचा आत्मविश्वास आणखीन वाढतो.”
भारतीय महिला संघ मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचला होता. रविवारी नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला होता.
या भेटीत मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार, सपोर्ट स्टाफ आणि निवड समिती सदस्यही उपस्थित होते. मोदींनी संघाच्या चिकाटी, संघभावना आणि लढाऊ वृत्तीचे कौतुक करत “ही केवळ क्रिकेटची नाही, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या सामर्थ्याची विजयकथा आहे,” असे म्हणाले.
विश्वविजयानंतर महिला संघाचे स्वागत नवी मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये जल्लोषात झाले. गुलाबाच्या पाकळ्यांनी साजरे करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्यात जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव आणि स्नेह राणा यांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत वातावरण रंगवले.
संघाने खास चार्टर फ्लाइटने दिल्लीचा प्रवास केला होता. राजधानीत त्यांच्या स्वागतासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. लवकरच विजय मिरवणुकीचे आयोजन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हरमनप्रीत कौरने अंतिम सामन्यातील निर्णायक कॅचनंतर आपल्या वडिलांच्या मिठीत धावत जाऊन भावनिक क्षण साजरा केला होता. या विजयाचा आनंद देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.
याचबरोबर माजी दिग्गज खेळाडू मिताली राज, अंजुम चोपडा आणि झूलन गोस्वामी यांचाही या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तर शेजाऱ्यांनी त्यांचे गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले.
भारताच्या महिला क्रिकेट इतिहासातील हा सुवर्ण क्षण देशभरात अभिमानाने साजरा होत असून, पंतप्रधान मोदींनीही “हा विजय भारतातील प्रत्येक कन्येच्या स्वप्नांना बळ देणारा आहे,” असे सांगून या यशाला नवा अर्थ दिला.