पुण्यातील जमीन व्यवहारावरून पार्थ पवार अडचणीत; फडणवीस म्हणाले, अनियमितता आढळल्यास कारवाई होणारच!

    06-Nov-2025
Total Views |
 
Parth Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
 
दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरेगाव पार्क येथील तब्बल १८०० कोटींच्या बाजारमूल्याची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेण्यात आली, तसेच या व्यवहारात फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा धक्कादायक आरोप आहे. याशिवाय, केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर नोंदणीकृत कंपनीने इतक्या मोठ्या व्यवहारात सहभाग घेतल्याचे दानवे यांनी सांगितले. या कंपनीकडून त्या ठिकाणी आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू असल्याचाही त्यांनी दावा केला आहे.
 
या प्रकरणाने उचल खाल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या व्यवहारासंबंधी सर्व माहिती महसूल विभाग, नोंदणी व भूमिअभिलेख खात्याकडून मागवली आहे. प्राथमिक चौकशी सुरू असून संपूर्ण अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”
 
फडणवीस पुढे म्हणाले, “प्राथमिक माहितीनुसार काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. जर कुठेही नियमबाह्य गोष्टी झाल्या असतील, तर निश्चितपणे कारवाई टाळता येणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारही अशा प्रकारांना पाठिंबा देणार नाहीत, असा मला विश्वास आहे.”
 
दरम्यान, अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पार्थ पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करावा, असे आवाहन केले आहे. सध्या या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत सरकारची अधिकृत भूमिका समोर येण्याची शक्यता आहे.