महाराष्ट्रात ‘स्टारलिंक’शी भागीदारी; एलॉन मस्कची कंपनी राज्यात आणणार उपग्रहाधारित वेगवान इंटरनेट!

    06-Nov-2025
Total Views |
 
Maharashtra
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार आणि एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीदरम्यान ऐतिहासिक करार झाला असून, या करारामुळे राज्यात उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. देशात अशा प्रकारचा करार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
 
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘स्टारलिंक’च्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या भागीदारीअंतर्गत राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये उपग्रहाद्वारे उच्चगती इंटरनेट नेटवर्क उभारले जाणार आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्टारलिंकसोबतची ही भागीदारी म्हणजे महाराष्ट्राच्या डिजिटल वाटचालीतील परिवर्तनकारी क्षण आहे. आता राज्यातील शेवटच्या गावापर्यंत विश्वासार्ह आणि वेगवान इंटरनेट पोहोचवण्याचे स्वप्न साकार होणार आहे.”
 
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीकडे जगातील सर्वात मोठे उपग्रह नेटवर्क असून, त्यांच्या माध्यमातून भारतात प्रथमच ग्रामीण भागांसाठी इंटरनेटसेवा उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शासकीय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट लाभ होणार आहे.
 
तसेच, या उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटीमुळे इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प, किनारपट्टी विकास, हवामान नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी घेत, ‘स्मार्ट कनेक्टेड महाराष्ट्र’कडे वाटचाल सुरू केली आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीसोबतचा हा करार राज्याच्या डिजिटल भविष्याचा पाया ठरेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.