खासदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त वाहतूक आराखड्यात बदल; नागपूरकरांना पोलिसांचे आवाहन

    05-Nov-2025
Total Views |
 
Nagpur Police Changes in traffic plan
 Image Source:(Internet)
नागपूर :
येत्या ७ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात होणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नागपूर (Nagpur) शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा लागू केला आहे.
 
दररोज सायं. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हे नियमन लागू राहील. या काळात सक्करदरा वाहतूक परिमंडळातील काही प्रमुख मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात येतील. यात आवारी चौक ते किडा चौक आणि किडा चौक ते आवारी चौक हा दोन्ही बाजूंचा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक अप्सरा चौक, अशोक चौक, मेडीकल चौक, बैद्यनाथ चौक आणि उंटखाना चौक मार्गे वळविण्यात येईल. तसेच बुधवारी बाजार ते किडा चौक जाणारी वाहतूकही तात्पुरती थांबविण्यात येईल.
 
सामान्य वाहतूकसाठी पर्यायी मार्ग म्हणून वैद्यनाथ चौक, अशोक चौक, अप्सरा चौक, केशवद्वार, संत गजानन चौक, तिरंगा चौक व गुरुदेव नगर चौक मार्गे उमरेड रोडकडे वाहतूक वळवली जाईल.
 
वाहतूक उपआयुक्त लोहित मतानी यांनी सांगितले की, हा विशेष वाहतूक आराखडा ७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत अंमलात राहील.
 
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना सहकार्य द्यावे आणि प्रवासाची पूर्वतयारी करावी, जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये.