नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी नागपूर प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी इटनकर यांची माहिती

    05-Nov-2025
Total Views |
 
Dr Vipin Itankar
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद (Nagar Parishad) आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणुका मुक्त, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
सदर येथील जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद प्रमुख उपस्थित होते.
 
निवडणुकीसाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून, मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या अधीन राहून होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
जिल्ह्यातील मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही डॉ. इटनकर यांनी केले. “आपला मतदानाचा हक्क बजावून आपण लोकशाही अधिक सशक्त करू शकतो,” असे ते म्हणाले.
 
या निवडणुकीत हजारो अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार असून, सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वय राखून निवडणुका यशस्वी करण्याची तयारी दाखवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही प्रशासनाने नमूद केले.