खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल

    05-Nov-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
उपचारासाठी रुग्णालयात दाखल-
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांना आरोग्य तपासणीसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ते काही दिवस विश्रांतीसाठी आपल्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
राऊत यांनी आधीच दिली होती माहिती-
अलीकडेच संजय राऊत यांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की, “माझ्या आरोग्याबाबत काही समस्या उद्भवल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. मी लवकरच बरा होईन, अशी मला खात्री आहे.”
 
नेत्यांकडून आरोग्यसुधारण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव-
या निवेदनानंतर राजकीय क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर-
आरोग्य कारणास्तव राऊत सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. डॉक्टरांनी त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. नवीन वर्षाच्या सुमारास ते पुन्हा सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.