देव दिवाळीचे धार्मिक महत्त्व;कार्तिक पौर्णिमेला दिवे लावा आणि मिळवा आयुष्यभराचं सौख्य

    05-Nov-2025
Total Views |
 
Dev Diwali
 Image Source:(Internet)
पुणे :
दिवाळीच्या उत्सवानंतर येणारा देव दिवाळीचा (Dev Diwali) दिवस हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवसाला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. श्रद्धेनं मानलं जातं की, या रात्री सर्व देवता स्वर्गातून पृथ्वीवर येऊन दीपप्रज्वलन करतात आणि शिवाची आराधना करतात.
 
पौराणिक आख्यायिकेनुसार, भगवान शंकरांनी आजच्या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा संहार करून देवतांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं. त्यानंतर सर्व देवांनी आनंद व्यक्त करण्यासाठी दिव्यांनी संपूर्ण विश्व उजळवलं. या घटनापासूनच देव दिवाळीचा प्रारंभ झाला असं मानलं जातं.
 
दिव्यांच्या प्रकाशात उजळणारी श्रद्धा-
देव दिवाळीच्या रात्री संपूर्ण घर, अंगण आणि देवस्थान दीपांच्या तेजाने उजळून निघते. या दिवशी दिवे लावणे म्हणजे केवळ शोभा नव्हे, तर सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. देवता घरात प्रवेश करून सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव करतात, अशी श्रद्धा आहे.
 
शुभ काळात करा दीपप्रज्वलन-
या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळात दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात केलेला प्रत्येक दिवा अंधार दूर करून मंगल प्रकाश फुलवतो. प्रदोषकाळात केलेलं दीपदान पापांचा नाश करून पुण्य वाढवतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
 
देव दिवाळीचं धार्मिक महत्त्व-
त्रिपुरासुराच्या विनाशानंतर तिन्ही लोकांत जो आनंद पसरला, त्याचं स्मरण या उत्सवात होतं. भगवान शंकराच्या विजयाचं प्रतीक म्हणून या दिवशी दीपदानाचं आयोजन केलं जातं. श्रद्धाळू लोक गंगेत स्नान करून शिवपूजन करतात.
 
काशीतील दिव्य सोहळा-
वाराणसीत देव दिवाळीचं वैभव अप्रतिम असतं. गंगाघाटावर लाखो दिव्यांच्या प्रकाशात शहर उजळून निघतं. भक्तगण गंगेच्या तीरावर आरती करून दिवे वाहतात आणि देवतांचं स्वागत करतात.
 
श्रद्धेचा संदेश-
देव दिवाळी हा केवळ उत्सव नाही, तर प्रकाशाचं आणि चांगुलपणाचं प्रतीक आहे. या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा अंधारावर मात करून जीवनात आशेचा किरण निर्माण करतो.