सोन्यात भेसळ करून मुथूट फिनकॉर्पला साडेदहा लाखांची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

    04-Nov-2025
Total Views |
- हिंगणा शाखेत घडला प्रकार; प्रतापनगर पोलिसांचा तपास सुरू

Muthoot Fincorp cheatedImage Source:(Internet) 
नागपूर :
सोन्याच्या शुद्धतेत भेसळ करून मुथूट फिनकॉर्प (Muthoot Fincorp) प्रायव्हेट लिमिटेडच्या हिंगणा शाखेला तब्बल 10.69 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
फिर्यादी मोहम्मद आतिक मोहम्मद झिया, शाखा व्यवस्थापक, मुथूट फिनकॉर्प (हिंगणा शाखा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहन राजेंद्रसिंह यादव आणि विनय गणेश नागपुरे या दोघांनी सोन्याची शुद्धता कमी असल्याचे माहिती असूनही कंपनीची फसवणूक केली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रोहन यादव यांनी सुमारे १५० ग्रॅम मिश्रधातूचे दागिने तारण ठेवून ८,४९,६१९ रुपयांचे कर्ज घेतले, तर विनय नागपुरे यांनी ४० ग्रॅम वजनाचा कडा तारण ठेवून २,२०,२५० रुपयांचे कर्ज घेतले. तपासात असे स्पष्ट झाले की या दागिन्यांच्या बाहेरील थरावर सोने असून आतील भागात इतर धातूंचा वापर करण्यात आला होता.
 
दोन्ही आरोपींनी ग्राहक बनून संस्थेचा विश्वासघात केला आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा केला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.