महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची घोषणा; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

    04-Nov-2025
Total Views |
- महापालिका निवडणुकांवर अजून निर्णय नाही

Municipal Council Nagar Panchayat electionsImage Source:(Internet) 
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Election) राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकीतून एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.
 
यावेळी आयोगाने स्पष्ट केले की, ही घोषणा फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आहे. राज्याच्या महापालिका निवडणुकांबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
निवडणुकीस पात्र नगरपरिषदांपैकी १० नवीन नगरपरिषदा, तर नगरपंचायतींमध्ये १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे. अजूनही १०५ नगरपंचायतींचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्या या टप्प्यात सहभागी होणार नाहीत.
 
या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.
 
या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य आले असून, सर्व प्रमुख पक्षांनी स्थानिक स्तरावर प्रचारयोजना आखण्यास सुरुवात केली आहे.