- निवडणूक आयोगाची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद
Image Source:(Internet)  
मुंबई : 
राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) राज्य निवडणूक आयोग आज (४ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीतील दुबार नोंदींवरून विरोधकांनी निवडणुका पुढे ढकवण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने तयारी पूर्ण केली असून, आजच कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल.
 
आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेला लोकप्रिय घोषणा, निधी वाटप किंवा विकासकामांची घोषणा करता येणार नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांसाठी राजकीय हालचालींना तात्पुरता ब्रेक बसणार आहे.
 
निवडणुकीची प्रक्रिया दीड ते दोन महिने चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयोगाने निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरमध्येच पार पडण्याची शक्यता आहे.
 
यानंतर डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीत पार पडण्याची शक्यता आहे. ज्या भागांत तात्काळ निवडणुका होणार नाहीत, तिथे आचारसंहिता अंशतः शिथिल ठेवली जाऊ शकते.
 
राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहणे सुरू केले आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजकीय तापमान उकळणार यात शंका नाही.