Image Source:(Internet)
दिंडोरी (नाशिक) :
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) दादा भुसे शिक्षण क्षेत्रात सुधारणा, सीबीएससी पॅटर्नची अंमलबजावणी आणि डिजिटल शिक्षण उपक्रम राबविण्याचा ध्यास घेत असतानाच त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा उघड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील जिल्हा परिषद शाळा सोमवारी अक्षरशः विद्यार्थ्यांविना रिकामी राहिली.
 
शाळेच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशी २३२ विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याने उपस्थिती लावली नाही. शिक्षकांच्या बदल्यांविरोधात पालकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. अलीकडेच या शाळेत संवर्ग-१ मधील शिक्षकांची बदली झाली असून, त्यांपैकी अनेक जण लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार, अशा शिक्षकांकडून दीर्घकालीन नियोजन किंवा विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा ठेवता येत नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये आहे.
 
पालक समितीच्या अध्यक्षा सुनीता बोस यांनी सांगितले की, “आज शाळेत २३२ पैकी एकही विद्यार्थी आलेला नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे. शाळेतील किमान अर्धे शिक्षक बदलून जुन्या शिक्षकांना परत नेमावे. आधीचे शिक्षक विद्यार्थ्यांशी जोडले गेले होते आणि त्यांचे शिक्षण मनापासून घेत होते.”
 
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, नव्याने आलेल्या शिक्षकांना गावाची, विद्यार्थ्यांची आणि शाळेच्या गरजांची ओळख नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पालकांनी सांगितले की, सध्या घेतलेला बहिष्कार हा इशारा स्वरूपातील आंदोलन आहे आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
 
या घटनेमुळे शिक्षण विभागाची अडचण वाढली असून, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना शाळा भरली ही बाब राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिक्षण सुधारण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनासमोर आता विश्वास पुनर्स्थापित करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.