शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त केलेच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

    03-Nov-2025
Total Views |
: मराठवाडा दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा संतप्त स्वर

Uddhav ThackerayImage Source:(Internet) 
औरंगाबाद :
राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहता, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्याआधी त्यांनी ठामपणे सांगितले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे भाग आहे. नाहीतर मी स्वतः शेतकऱ्यांच्या गावात जाऊन खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणीन.”
 
उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने जाहीर केलेल्या मदतपॅकेजचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही, हे मी स्वतः पाहणार आहे. केवळ आकडे मांडून शासनाची जबाबदारी संपत नाही. ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना माती पुरवा आणि खरी कर्जमाफी करा. कारण हेच शेतकऱ्यांचे हक्काचे आणि योग्य मागणे आहे.”
 
ते पुढे म्हणाले, “सरकार म्हणते जूनमध्ये कर्जमाफी केली जाईल. पण तोपर्यंत शेतकरी हप्त्यांचे काय करणार? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं सरकार वागत आहे.”
 
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका करताना ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल म्हणून ती केली जात नाही. पण मग जूनमध्ये केली तर बँकांना तोटा होईल का? हे कोणतं हास्यास्पद अर्थशास्त्र आहे?”
 
ठाकरेंनी पुढे सांगितले, “मी मुख्यमंत्री असताना कोणाच्याही मागणीशिवाय आम्ही कर्जमाफी केली होती. त्यासाठी तयार केलेली सिस्टीम आजही तशीच कार्यरत आहे. सरकारकडे सर्व माहिती आणि डेटा आहे, मग कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात विलंब का?”
 
मराठवाड्याच्या दौऱ्यात ठाकरे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या हाती नेमकी किती मदत पोहोचली आहे, याचा आढावा घेणार आहेत.
 
“लोक मला सांगतात. ‘साहेब, तुम्ही जेव्हा होतात, तेव्हा मदत मिळाली; आता केवळ आश्वासनं मिळतात.’ त्यामुळे आम्ही आता पुन्हा मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणार,” असा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.