Image Source:(Internet)
अमरावती :
तब्बल १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि सातत्यपूर्ण संघर्षानंतर नितेश मेश्राम (Nitesh Meshram) यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याचे तत्कालीन थानेदार अजय कवडुजी अहिरकर यांच्यासह एकूण नऊ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
११ जून २०२४ रोजी घडलेल्या या घटनेत, पोलिस कोठडीत असताना नितेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने त्यांना अमरावतीच्या इरविन रुग्णालयात उपचारासाठी हलवले गेले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी आरोप केला की हा मृत्यू अपघाती नसून पोलिस अत्याचाराचा परिणाम आहे.
आरोपी पोलिसांमध्ये थानेदार अजय अहिरकर, पोहवा राजकुमार मुलमचंद जैन, नापोशी विशाल मुकुंदराव रंगारी, पोहवा प्रवीण रामदास मेश्राम, पोशी अलीम हाकिम गवली, पोशी अमोल अमृतराव घोडे, नापोशी प्रशांत ढोके आणि दोन महिला कर्मचारी यांचा समावेश आहे.
अकोल्यात करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालात, डॉक्टरांनी नमूद केले की नितेशच्या शरीरावर १६ ठिकाणी जखमा आढळल्या आणि त्या गंभीर जखमांमुळेच मृत्यू झाला. तरीही, स्थानिक पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी १३ जानेवारी रोजी चांदूर रेल्वे येथे भेट देऊन मृतकाच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यानंतर नागपुरात २७ जानेवारी आणि १७ फेब्रुवारी रोजी आयोगाने विशेष बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला.
आयोगाने पोलिस तपासातील गंभीर त्रुटी आणि विसंगतींचा उल्लेख करत, मार्च २०२५ मध्ये अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अखेर आयोगाच्या सूचनांनुसार ९ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या निर्णयानंतर, दीर्घकाळ न्यायासाठी लढा देणाऱ्या मेश्राम कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.