मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी एकवेळ आई मेली तरी...; प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरून वादाचा भडका

    03-Nov-2025
Total Views |
 
Prakash Surve statement
Image Source:(Internet) 
मुंबई :
शिंदे गटाचे मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय समाजाच्या एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी म्हटले, “मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे.”
 
या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला असला, तरी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुर्वे पुढे म्हणाले, “आईपेक्षा जास्त प्रेम मावशी करते. उत्तर भारतीय समाजाने मला आईपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांनाही द्या.” त्यांनी उत्तर भारतीय मतदारांना उद्देशून आपल्या नात्याची जवळीक अधोरेखित केली.
 
अलीकडेच सुर्वे यांनी म्हटलं होतं की, “उत्तर भारतीय आणि आमचं नातं अतूट आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी तीन वेळा आमदार झालो.”
 
या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सुर्वे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “२०२२ मध्येच या लोकांनी आईला म्हणजेच मूळ शिवसेनेला रामराम केला. आता म्हणतात आई मेली तरी चालेल! एका आमदारकीसाठी एवढी लाचारी? माझ्या गर्भातून ज्याला वाढवलं, त्यानेच आईचा अपमान केला, हे पाहून कोणत्याही आईचं मन विदीर्ण होईल.”
 
वाद पेटल्यानंतर प्रकाश सुर्वे यांनी सोशल मीडियावरून आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “आई देवाचे रूप असते. माझ्या बोलण्याचा हेतू चुकीचा लावला जात आहे. मी एवढंच सांगितलं की, आई नसते तेव्हा मावशी आपल्यावर प्रेम करते. कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
 
सुर्वे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाचा भडका उडाल्याचं चित्र आहे.