प्रतिबंधित नायलॉन मांजाची तस्करी उघड; तहसील पोलिसांची कारवाई, ई-रिक्शा चालक अटक

    29-Nov-2025
Total Views |
 
Arrested
 Image Source:(Internet)
नागपूर :
मकरसंक्रांतीला अजून महिना-पंधरा दिवस असताना शहरात पुन्हा एकदा प्रतिबंधित नायलॉन (Nylon) मांजाच्या बेकायदा व्यापाराने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर तहसील पोलिसांनी मोठी मोहीम राबवत ई-रिक्शामधून वाहतूक केली जात असलेल्या नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला. गीतांजलि चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली असून, एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
 
तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्ती दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एका ई-रिक्शामध्ये शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा नेला जात आहे. त्यानंतर तत्काळ पथकाने रिक्शा अडवला. चालकाची ओळख मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद अशी पटली. तपासणी केली असता रिक्शामधून तब्बल २६० चकऱ्या प्रतिबंधित मांजाच्या आढळल्या.
 
या कारवाईत पोलिसांनी ई-रिक्शासह जवळपास ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत आरोपीने हा माल मोमिनपुरा येथील मोहम्मद सिद्दीकी अन्सारी याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्य पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास अधिक गतीने सुरू केला आहे.