नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरला राज्यात सार्वत्रिक सुट्टी; मतदारांना दिलासा

    29-Nov-2025
Total Views |
 
Nagar Panchayat Elections
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची (Elections) प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदानातील घटती टक्केवारी थांबवून नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा आयोगाचा प्रयत्न यामागे दिसून येतो.
 
२४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया-
कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांमधील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायती यांच्यासाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यात एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार सहभागी होणार असून ६,८५९ सदस्य आणि २८८ नगराध्यक्ष लोकशाही प्रक्रियेतून निवडले जाणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर EVM यंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार आहे.
 
यंदा १० नवी नगरपरिषद आणि १५ नवी नगरपंचायतीही मैदानात-
या निवडणुकांमध्ये १० नव्या नगरपरिषदांसह १५ नव्या नगरपंचायतींचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची नवी सुरुवात होत आहे.
 
दुबार नोंदी शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर-
मतदार यादीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून डुप्लिकेट नावे वेगळी काढली आहेत. ज्यांच्या नावांमध्ये तफावत किंवा द्विरुक्ती आढळली आहे, त्यांच्या नावांसमोर ‘डबल स्टार’ चिन्ह देण्यात आले आहे. अशा व्यक्तीने मतदान केंद्रावर हजर झाल्यास, त्याने दुसरीकडे मतदान केलेले नाही याची लेखी खात्री घेतली जाणार आहे.
 
मतदानाचा उत्साह वाढवण्यासाठी पुढाकार-
मतदानासाठी सुट्टी जाहीर करून आयोगाने नागरिकांचे लक्ष मतदानाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कामकाजामुळे मतदानाला मुकणारे मतदार आता निर्धास्तपणे मतदान केंद्रावर जाऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
मतदान २ डिसेंबरला, तर मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडणार असून, लोकशाहीचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.