Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Elections) प्रचारबंदीची वेळ बदलत नवीन आदेश जारी केला आहे. सुधारित नियमानुसार, मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजता सर्व प्रचारकार्य थांबणार आहे. म्हणजेच २ तारखेला मतदान असेल तर १ तारखेला रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही.
याआधीची तरतूद अशी होती की मतदानाच्या २४ तास आधीपासून प्रचारबंदी लागू होत असे. मात्र विद्यमान अधिनियमाशी तफावत टाळण्यासाठी आयोगाने पूर्वीची तरतूद बदलून ही नवी मर्यादा निश्चित केली आहे.
नव्या नियमांनुसार रात्री १० नंतर सभा, प्रचारमिरवणुका, ध्वनिक्षेपकांचा वापर, तसेच जाहिरातींचे प्रसारण सर्वस्वी बंद राहणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २३ मध्ये मतदानाच्या दिवशी जाहीर सभा घेण्यास बंदी असल्याने, त्यास अनुसरून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार सचिव सुरेश काकाणी यांनी हा सुधारित आदेश जाहीर केला असून, निवडणूक शांततेत आणि नियमबद्धरीत्या पार पाडण्यासाठी हा बदल अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.