लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा; केवायसीबाबत भ्रम दूर, 52 लाख महिला अपात्र नाहीत!

    27-Nov-2025
Total Views |
 
Aditi Tatkare on Ladki Bhaeen Yojana
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना (Ladki Bhaeen Yojana) संदर्भात नुकताच प्रसार माध्यमांमध्ये काही चटकदार बातम्या चर्चेत आल्या होत्या, ज्यात केवायसीच्या प्राथमिक छाननीत 52 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचे म्हटले गेले होते. मात्र, आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट खंडणी केली असून या बातम्यांना पूर्णपणे निराधार ठरवले आहे.
 
लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी असून, ज्यांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकार दर महिन्याला 1500 रुपये जमा करते. ही योजना महायुतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावते. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे महायुतीला मोठा लाभ झाला होता आणि राज्यात त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले.
 
दरम्यान, योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि लाभार्थींची खात्री करण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या भ्रमामुळे अनेक महिला चिंतित झाल्या होत्या, पण आदिती तटकरे यांनी सांगितले की ही प्रक्रिया अजून सुरू आहे आणि 52 लाख महिला अपात्र असल्याचा आरोप तर्कसंगत नाही.
 
आदिती तटकरे म्हणाल्या,
“योजनेतील पारदर्शकता आणि पात्र लाभार्थी महिलांना नियमित आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करणे योग्य नाही.”
 
यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, शासनाकडून योजनेंतर्गत आर्थिक मदत सुरळीतपणे सुरू राहणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.