महायुती सरकारच्या नव्या नियमांचा फटका; राज्यातील शेकडो मराठी शाळांवर बंदीची टांगती तलवार

    26-Nov-2025
Total Views |
 
Marathi schools
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण करणारा निर्णय समोर आला आहे. राज्य शिक्षण विभागाने सुरू केलेल्या नव्या शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे तब्बल ६०० मराठी शाळा (Marathi schools) बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे. या बदलांचा फटका सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे.
 
सरकारने अलीकडेच शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीचे निकष बदलले आहेत. या बदलानुसार अनेक लहान मराठी शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत. शिक्षक मिळाले नाहीत तर शाळा चालवता येणार नाही, आणि त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील अनेक शाळांवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
इयत्ता ९वी आणि १०वीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ठरवण्याच्या निकषांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी तीन विद्यार्थी असले तरी शिक्षक मान्यता मिळत होती. मात्र आता किमान २० विद्यार्थी नसतील तर शिक्षक मंजूर होणार नाही. अनेक मराठी शाळांत २० विद्यार्थीही नसल्याने त्या थेट शिक्षकांविना उभ्या राहणार आहेत.
 
या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आणि पालकांनी राज्यभर आवाज उठवला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येत असून, अन्यथा मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल, असे पालकांचे मत आहे.
 
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर येत्या ६ डिसेंबरनंतर राज्यातील शेकडो मराठी शाळांना कुलूप लागण्याची भीती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी शाळांच्या अस्तित्वावर संकट वाढत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.