Image Source:(Internet)
नारायणपूर :
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलप्रभावित नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी 28 नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. यापैकी 22 जणांवर एकूण 89 लाखांचे बक्षीस घोषित होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 19 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पट्टीलिंगम यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या ‘नियाद नेल्लानार’, नवीन आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरण, तसेच ‘पुना मार्गम’ यांसारख्या योजनांच्या प्रभावामुळे नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला.
आत्मसमर्पण करणाऱ्यांत माओवादी पूर्व बस्तर विभागातील मिलिटरी कंपनी क्रमांक 6 चे चार कट्टर सदस्य - पंडी ध्रुव उर्फ दिनेश, दुले मांडवी उर्फ मुन्नी, चत्तीस पोयाम आणि पडनी ओयाम — यांच्यावर प्रत्येकी 2 लाखांचे बक्षीस होते.
तसेच क्षेत्र समिती सदस्य — नुरेती, सकिला कश्यप, शामबत्ती शोरी, चैते उर्फ रजिता आणि बुधरा रवा — यांच्यावर प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस जाहीर होते.
गेल्या 50 दिवसांत बस्तर रेंजमध्ये 512 हून अधिक नक्षलवादी आत्मसमर्पण करीत मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. नारायणपूरचे एसपी रॉबिन्सन गुरिया यांच्या मते, या वर्षी एकूण 287 नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात आत्मसमर्पण केले आहे.