Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना डॉक्टरांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवस विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिल्यानंतर ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर होते. ही माहिती राऊत यांनी स्वतः सोशल मीडियावरून जाहीर केली आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास सुरुवात केली.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांची भेट घेतली. राऊत यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांनी हालचाली आणि गर्दी टाळण्याचे निर्देश दिले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर लिहिले होते की, “आरोग्याच्या काही अडचणी असूनही, उपचार चालू आहेत. सध्या बाहेर जाण्यावर निर्बंध आहेत, पण लवकरच ठणठणीत होऊन नव्या उत्साहाने भेटू.”
दरम्यान, आरोग्य बिघडूनही संजय राऊत आज शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले. भावाचा सुनील राऊत हात धरून सावकाश चालत स्मृतिस्थळी पोहोचलेल्या राऊत यांनी शिवसैनिकांकडे हात करून अभिवादन केले आणि बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर नतमस्तक झाले. त्यांच्या या जिद्दीने उपस्थित शिवसैनिक भारावून गेले.
उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना हसत-हसत म्हटले,आता रोज संजयला फोन करत नाही… पण सुनीलला मात्र रोज विचारतो! आज भेट झाली, ते उत्साही दिसले. फार काळ ते घरात थांबणार नाहीत. लवकरच पुन्हा राजकीय रिंगणात दमदार पुनरागमन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असून त्यांच्या लवकर पुनरागमनाच्या शक्यतेने शिवसैनिकांमध्येही समाधान दिसत आहे.