मतदार यादीतून हरकत दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत द्या अन्यथा निवडणूक रद्द करा; ठाकरे बंधूंची मागणी

    25-Nov-2025
Total Views |
 
Thackeray brothers
 Image Source:(Internet)
मुंबई:
मतदार यादीतील गंभीर गोंधळ लक्षात घेऊन ठाकरे बंधूंनी (Thackeray brothers) राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे की, प्रारूप मतदार यादीवर हरकत आणि सूचनांसाठी किमान २१ दिवसांची मुदत द्यावी. अन्यथा सध्याच्या गोंधळामुळे निवडणुका रद्द करून यादी योग्य प्रकारे तयार केल्यावरच निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
उद्धवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची सोमवारी भेट घेतली आणि निवेदन दिले. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, ॲड. अनिल परब, अंबादास दानवे व बाळा नांदगावकर यांचा समावेश होता.
 
शिष्टमंडळाने एका मतदाराला एका दिवशी फक्त एकाच प्रभागात मतदान करण्याचा नियम स्पष्ट करण्याचीही मागणी केली आहे. सध्याच्या नियमांनुसार एका दिवशी मतदार एकाच ठिकाणी मतदान करतो, पण प्रत्यक्षात एखादा मतदार एका दिवशी जिल्हा परिषद आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेत मतदान करतो, असा प्रकार आढळतो. त्यामुळे या नियमात सुधारणा करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
 
ठाकरे बंधू म्हणाले की, विरोधी पक्षांच्या प्रभागांमध्ये काही इमारती चुकीच्या प्रभागांमध्ये दाखल केल्या गेल्या आहेत. हा प्रश्न मुंबईपुरता मर्यादित नसून ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महापालिका क्षेत्रांमध्येही समान प्रकारे घडत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी यादीत योग्य प्रकारे सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.