Image Source:(Internet)
गुवाहाटी / सिंगापूर :
ईशान्य भारताचा अत्यंत लोकप्रिय गायक जुबिन गर्ग (Zubin Garg) यांच्या सिंगापूरमधील मृत्यू प्रकरणात मोठा उलटफेर झाला आहे. आतापर्यंत ‘अपघाती मृत्यू’ म्हणून ज्या घटनेची नोंद झाली होती, त्यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट ‘हत्या’चा आरोप लावला आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या जुबिन गर्ग यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. सिंगापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि पोस्टमॉर्टेम अहवालातही मृत्यूचे कारण ‘ड्राऊनिंग’ असेच नोंदवण्यात आले. मात्र या निष्कर्षाबाबत कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी सतत शंका उपस्थित केल्याने आसाम सरकारने स्वतंत्र तपास सुरू केला.
या तपासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सरमा यांनी अत्यंत ठाम भाषेत सांगितले की, जुबिनचा मृत्यू हा काही योगायोगाने झालेला अपघात नव्हता, तर त्यामागे कुणाचातरी स्पष्ट हेतू होता. त्यांनी राज्य सरकार गंभीरपणे तपास करत असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत पळता येऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने या प्रकरणासाठी विशेष तपास यंत्रणा आणि स्वतंत्र न्यायिक चौकशीची नियुक्ती केली आहे. चौकशीत अनेक विसंगती उघड झाल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक, जुबिनचे व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेत सहभागी असलेल्या काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मिळालेली संशयास्पद रक्कम पाहता आर्थिक अनियमिततेचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
सिंगापूर पोलीस अजूनही हा मृत्यू अपघाती असल्याचा दावा करत असले तरी, आसाम सरकार मात्र याला हत्या मानूनच पुढे तपास करत आहे. लवकरच या प्रकरणाची चार्जशीट दाखल होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जुबिन गर्ग यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद होत असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता वाढत आहे. सांस्कृतिक ते राजकीय क्षेत्रापर्यंत या प्रकरणाची चर्चा जोर धरत असून पुढील काही दिवसांतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.