महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवामान अस्थिर; २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

    25-Nov-2025
Total Views |
 
Heavy rains
 Image Source:(Internet)
मुंबई :
भारतातील हवामान पुन्हा सक्रिय झाले असून भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा (Heavy rains) इशारा दिला आहे. २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत देशाच्या अनेक भागांत पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. वायव्य आणि मध्य भारतात तापमानात विशेष बदल होणार नसला, तरी दक्षिण आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे.
 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जाणवणारी गारवा कमी होत असून ढगाळ हवामानामुळे तापमान उबदार झाले आहे. कोकणपट्टी तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
अंदमान-निकोबार बेटांमध्ये सलग काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, माहे आणि किनारी आंध्र प्रदेशातही आठवड्याच्या मध्यावर पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात तीव्र थंडी जाणवत होती. मात्र सध्या आकाश सतत ढगाळ असल्याने तापमान पुन्हा वाढले आहे. हवामानातील या उलटफेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. वाढती उष्णता आणि आर्द्रता पिकांवर बुरशीजन्य रोगांचा धोका निर्माण करू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानावर शेतकरी वर्गाचे लक्ष केंद्रीत राहणार आहे.