नागपुरात साक्षगंध समारंभात वादातून गोळीबार; सात जणांना पोलिसांनी केली अटक

    25-Nov-2025
Total Views |
 
Firing
 Image Source:(Internet)
नागपूर :
कळमेश्वर तालुक्यातील शंकरपट गावात रविवारी आयोजित साक्षगंधाच्या कार्यक्रमानंतर (Engagement ceremony) अचानक तणाव निर्माण झाला. कुटुंबातील जुन्या वादाचा ठिणगी पेटताच मारहाण आणि गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तातडीच्या कारवाईत सात आरोपींना अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम आटोपल्यावर देवा ऊर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याने जुन्या कारणांवरून बाल्या हिरामण गुजर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि धुमश्चक्री सुरू झाली. त्यानंतर देवा आणि त्याचे साथीदार तपन पिसाराम एकनाथ, आकाश एकनाथ, मोरेश्वर एकनाथ, सावन एकनाथ, काशिराम एकनाथ आणि दिनेश सनेश्वर यांनी गोळीबार केला.
 
गोळ्या लागून बाल्या गुजर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या अचानक धावपळीत बाल्याचा भाऊ सुनील गुजर आणि मुकश मापूर यांसह काही पाहुणेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. परंतु कळमेश्वर पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून सापळे रचत सर्व आरोपींना काही तासांत जेरबंद केले.
 
चार महिन्यांपूर्वी घडलेल्या अपहरणप्रकरणातील वैमनस्यातूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.