Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Elections) अगोदर महाविकास आघाडीत (MVA) कलह वाढत चालला असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत सामील करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काँग्रेस त्याला कडाडून विरोध करत आहे. या घडामोडींमुळे आघाडीचा भवितव्यच प्रश्नचिन्हात सापडले आहे.
बीएमसीसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जवळ येत असताना काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा सूर लावल्याने आघाडीत तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यातच मनसेच्या सहभागी होण्याच्या प्रस्तावाने उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उघड संघर्ष निर्माण झाला आहे.
शरद पवारांच्या गटाची भूमिका बदलली?
बीएमसी निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, राखी जाधव यांसारखे नेते चर्चेत सहभागी होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “भाजप सोडला तर आम्ही कोणत्याही पक्षासोबत निवडणूक लढवण्यास तयार आहोत. मग ते समाजवादी पक्ष असो किंवा मनसे.या भूमिकेमुळे काँग्रेसचा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची नाराजी वाढतच-
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि अनेक नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन बीएमसी निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र लढवाव्यात, आणि मनसेला आघाडीत नको, अशी मागणी केली होती.
शरद पवारांनी २२ नोव्हेंबरच्या पक्ष बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शनिवारी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीतील बहुतांश नेत्यांनी ठाकरे बंधूंसोबत आघाडी करण्याची मागणी केल्याचे समजते.
काँग्रेसमध्येही मतभेद उफाळले-
मनसेच्या सहभागाच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यापक आघाडी करून भाजपला रोखण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तर वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की, मनसेसोबत हातमिळवणी करणे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत बसत नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार,ज्यांच्यासोबत आम्ही आधी संघर्ष केला, त्यांच्याशी आता युती करण्याचा प्रश्नच नाही.
आघाडीचे भविष्य अनिश्चित-
या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव आणखी वाढला असून बीएमसी निवडणुकीत कोण कोणासोबत राहणार याची स्पष्टता अद्याप नाही. शरद पवारांचा अंतिम निर्णय आघाडीच्या समीकरणांवर मोठा परिणाम करणार असल्याचे मानले जात आहे.