Image Source:(Internet)
मुंबई :
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा गरीब घरातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (Ladki Bhaeen Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. ही योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार असून आता याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे.
नोव्हेंबर महिना संपायला थोडे दिवस शिल्लक असून, लाभार्थी महिलांना या महिन्याचा निधी कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असल्यामुळे अचारसंहितेचा कालावधी लागू असल्याने नोव्हेंबर महिन्याचा पैसा वेळेत जमा होण्याबाबत अनिश्चितता आहे.
याच पार्श्वभूमीवर अशी चर्चा आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्र करून लाभार्थींच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. म्हणजेच डिसेंबर महिन्यात दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही माहिती सध्या अंदाजावर आधारित असून प्रशासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
केवायसीसाठी मुदतवाढ
योजनेअंतर्गत केवायसी (ओळख पडताळणी) अनिवार्य करण्यात आली आहे, कारण काही लाभार्थी या योजनेचा गैरवापर करत असल्याचा आढावा आहे. यासाठी सुरुवातीला १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत केवायसी पूर्ण करण्याचा नियम ठेवण्यात आला होता. मात्र, अनेक लाभार्थ्यांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारने केवायसीची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीनंतर ज्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप संपलेली नसेल, त्यांचे पुढील पैसे रोखले जाऊ शकतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.