राज्यभरातील शाळांमधील उपस्थितीवर शिक्षण विभागाची कडक नजर

    24-Nov-2025
Total Views |
- अचानक तपासणीची मोहीम सुरू

Education DepartmentImage Source:(Internet) 
नागपूर:
राज्यातील शाळांमधील उपस्थितीच्या नोंदींमध्ये होत असलेल्या अनियमितता थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने (Education Department) मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच विशेष तपासणी पथके राज्यभरातील शाळांना अचानक भेट देतील आणि वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीची तपासणी करतील. नोंदीत दाखवलेले आकडे आणि प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्या यामध्ये फरक आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
 
येत्या शैक्षणिक वर्षापासून यू-डायस प्लस प्रणालीवरील माहिती शाळांच्या मान्यतेसाठी निर्णायक ठरणार आहे. मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉगिनमधून नोंदवलेले विद्यार्थ्यांचे तपशीलच अधिकारी अंतिम मानणार आहेत. या माहितीची पडताळणी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीतून करणे बंधनकारक राहील.
 
केंद्रप्रमुख शाळांमधील दैनंदिन हजेरी, परीक्षा दिवसातील उपस्थिती आणि पूर्वीच्या भेटीतील नोंदींची तंतोतंत छाननी करणार आहेत. गैरहजर किंवा संशयास्पद विद्यार्थ्यांची नावे थेट यू-डायस प्लस मधून वगळली जाऊ शकतात.
 
उपस्थिती वाढवून दाखवणे, खोटी नावे जोडणे किंवा शिक्षक-कर्मचाऱ्यांची सततची अनुपस्थिती असे प्रकार आढळल्यास मुख्याध्यापकांपासून केंद्रप्रमुखांपर्यंत सर्वांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
 
सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती अंतिम करून ऑनलाईन पडताळणी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.