मनसेशी युती नाकारण्याचा काँग्रेसचा पवित्रा; राऊतांच्या वक्तव्याने रंगल्या नव्या राजकीय चर्चा

    22-Nov-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसे-शिवसेना युतीचा मुद्दा पुन्हा एकदा जोरात चर्चेत आला आहे. काँग्रेसने “मनसेला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नाही” असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडाली आहे.
 
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे प्रत्यक्षात आधीच एकत्र आले आहेत, आणि या एकजुटीसाठी “न दिल्लीतून आदेश लागतात, न कुणाची परवानगी.”
 
राऊत म्हणाले की, “काँग्रेसचा हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. पण मुंबईचा हिताचा प्रश्न असताना जनतेची इच्छा महत्त्वाची.”
 
काँग्रेसने मनसेला आघाडीत न घेण्याची भूमिका जाहीर केली असली तरी राऊत यांनी त्यावर फिकट प्रतिक्रिया देत म्हटले की—
“मुंबईला वाचवण्यासाठी ज्या शक्ती एकत्र आल्या पाहिजेत, त्या येत आहेत. हा लोकभावनेचा निर्णय आहे.”
 
यावेळी त्यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय ऐक्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. राऊतांनी संकेत दिला की मनसेबाबतचा निर्णय ‘भविष्यात’ नव्हे, तर ‘आधीच झालेला’ आहे आणि शिवसेना-मनसे एकत्रितपणे काही मोठे पाऊल उचलणार असल्याची राजकीय चर्चा अधिकच गती घेत आहे.