Image Source:(Internet)
नागपूर :
खापरखेडा (Khaparkheda) पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर स्तब्ध झाला आहे. कपडे वाळत घालताना एका महिलेला विजेचा धक्का बसला आणि तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलाचाही मृत्यू झाला. जयभोले नगरमधील या हृदयद्रावक घटनेत निर्मला उत्तम सोनटक्के (५१) आणि तिचा मुलगा लोकेश उत्तम सोनटक्के (३१) यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, निर्मला सोनटक्के घराबाहेरील लोखंडी तारेवर कपडे वाळवत होती. हे काम करताना तारेचा संपर्क वरून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईनशी आला आणि निर्मलाला जोराचा विजेचा धक्का बसला. तिच्या किंकाळ्या ऐकून नुकताच नाईट ड्यूटी संपवून घरी परतलेला मुलगा लोकेश आईकडे धावला. त्याने आईला हात लावताच त्यालाही विद्युतप्रवाह लागला आणि तोही कोसळला.
दरम्यान, दोघांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आणि महावितरणचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
या दुर्दैवी प्रसंगामुळे जयभोले नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.